तारे जमीपर

जाहिरातींमधील तारे जमींपर..
जाहिरात हा अतिशयोक्तीचा भाग न होता वास्तवाचा आरसा झाला पाहिजे. त्यात नाट्यमयता असावी, पण असत्यकथन असता कामा नये.या कसोटीवर आता जाहिराती करणाऱ्या ताऱ्यांवरही उत्तरदायित्व सोपविण्यात येणार आहे. प्रेक्षक, ग्राहक भाबडेपणाने आपल्या ‘दैवता‘च्या सांगण्यावर विश्वास ठेवतात आणि खरेदी करतात आणि मग ती वस्तू निकृष्ट निघाली की हात चोळीत गप्प बसतात. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले म्हणून की काय; पण आता अशा शिफारस करणाऱ्या जाहिरातींना योग्य चाप बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसावा, म्हणून जबर दंड आणि शिक्षा यांची तरतूद असलेले विधेयक येत्या अधिवेशनात येऊ घातले आहे. दहा लाख रुपये दंड आणि किंवा दोन वर्षे तुरुंगवास असे शिक्षेचे स्वरूप असेल. पुन्हा पुन्हा हा गुन्हा करणाऱ्यास अधिक कडक शिक्षेची /दंडाची तरतूद यात असेल. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू जाहिरात करताना त्या वस्तूचा किंवा सेवेचा दर्जा न पाहता त्या वस्तूची शिफारस करत असतील तर तो गुन्हा आहे, तसेच सेवादूत (ब्रॅंड ऍम्बेसिडर) म्हणून काम करताना अधिक काळजी घेतली जावी, अशी अपेक्षाही यामागे आहे; पण तरीही अशा वस्तूंचा, सेवांचा पुरस्कार करणाऱ्या या ‘स्टार जाहिराती‘ भारतीय जाहिरातविश्वाचा एक महत्त्वपूर्ण घटक झाल्या आहेत. किंबहुना सर्जनशीलतेची जागा आता या तारे-तारकांनी घेतली आहे, असे म्हटले तरी चालेल.
   आपल्याकडे 1970-80 च्या दशकात याचे पेव फुटले. प्रेशर कुकर, अंघोळीचा साबण याच्या जाहिरातीसाठी सिनेकलाकार, तर सुटिंग्जसाठी विक्रमवीर क्रिकेटपटू आपल्याला त्या वस्तूचे गुणगान गाताना दिसले. मग कधी ग्रामीण भागाचा स्पर्श न झालेले शेतातील ट्रॅक्‍टरवर आपल्याला विराजमान झाल्याचे दिसले; पण आपणही चिकित्सा न करता त्या जाहिराती स्वीकारल्या. महत्त्वाच्या वस्तू आणि सेवा क्षेत्रातील 65% जाहिराती या कोणत्या ना कोणत्या लोकप्रिय व्यक्तीला घेऊन केल्या जातात. चीनमध्ये हे प्रमाण 45 टक्के, तर पाश्‍चिमात्य देशात ते 35 टक्के एवढे आहे. 2016 साल संपताना आपल्या देशातील जाहिरात विश्वाची आर्थिक उलाढाल 42 हजार कोटींपर्यंत पोचलेली असेल आणि त्यातील 10 हजार कोटी रुपये हे या जाहिरातदूतांवर खर्च झालेले असतील. एकूणच भारतीय मानसिकता ही व्यक्तिपूजेच्या प्रवृत्तीने ग्रस्त असल्यामुळे जाहिरात संस्थांना अशा मोठ्या लोकांना घेऊन आपले उत्पादन आणि सेवा जनतेसमोर आणण्याचा मोह होत असावा. पण हे करताना आपल्या उत्पादनाला याचा खरंच लाभ मिळतो का याचीही शहानिशा व्हायला हवी. आज देशातील 3 सिनेकलाकार आणि दोन क्रिकेटपटू हे एकूण 50 उत्पादने आणि सेवांची जाहिरात करत आहेत. डोक्‍याला लावायच्या तेलापासून ते डिश अँटिनापर्यंत आणि शीतपेयापासून ते बासमती तांदळापर्यंत आपल्याला तेच तेच चेहेरे पुन्हा पुन्हा दिसतात. एखादी जाहिरात लक्षात राहणे, ती पुन्हा पुन्हा आठवणे हे खरेदीच्या निर्णयातील महत्त्वपूर्ण टप्पे असतात आणि लोकप्रिय व्यक्तीमुळे त्या तशा आठवतातही; पण वलयांकित ‘चेहेऱ्या‘च्या अतिवापराचे प्रतिकूल परिणाम विक्रीवर होऊ शकतात याचे भानही ठेवायला हवे. काही वेळा कलाकाराचे व्यक्तिमत्त्व आणि ज्या वस्तूची तो/ती जाहिरात करत आहे यांच्यात मेळ नसतो, तेव्हा ग्राहक अशा जाहिरातींवर विश्वास ठेवत नाहीत. पण अशा काही जाहिराती असतात की त्यात हा समन्वय उत्तम साधला जातो.
   नेत्रदानाविषयी ऐश्वर्या राय हिचे आवाहन किंवा सध्या सचिन तेंडुलकरची कौशल्यविकासाची एक जाहिरात पाहायला मिळते. यात त्याने आपल्या खेळाच्या कौशल्याएवढेच वस्तू बनवणाऱ्या कारागिराचे कौशल्यही तेवढेच श्रेष्ठ असल्याचे तो सांगतो. त्याचा चांगला प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. पण अशी उदाहरणे विरळच. जाहिरात करणाऱ्या कलाकाराचे चारित्र्य आणि विश्वासार्हता या गोष्टी प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. एका आरोपाखाली एका लोकप्रिय नटावर अटकेची टांगती तलवार होती, तेव्हा त्यांनी केलेल्या बहुसंख्य जाहिराती छोट्या पडद्यावरून अदृश्‍य झाल्या. अगदी ताजे उदाहरण म्हणजे ‘अतुल्य भारत‘च्या जाहिरातीसाठी अमिताभ बच्चन यांच्याशी होणारा करार ‘पनामा पेपर्स‘ हे प्रकरण समोर आल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. 
( लेख - सकाळ )
दिनांक - 27 april 2016

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....