फक्त दोनच.......

सिनेमांची कमाई आता 100 कोटींवरून 200 कोटींवर झेपावणार असल्याच्या कितीही बाता बॉलिवूडकरांकडून मारल्या जात असल्या, तरी त्या पोकळ ठरल्याचं दिसून येतंय यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुमारे 80 हिंदी चित्रपटांपैकी जेमतेम 2 चित्रपटांना 100 कोटींचा आकडा गाठता
आलाय. प्रेक्षकांची पसंती आशयघन सिनेमांना जास्त मिळते. सिनेमातून दिल्या जाणा-या संदेशावर लोकांचं लक्ष आहे.
यावर्षांची सुरुवातच अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर असे दोन तगडे स्टार असलेल्या 'वझीर' ने झाली खरी पण हा चित्रपट चालला नाही. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' नं आशयाच्या जोरावर 128 कोटीचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मात्र शाहरूखचा 'फॅन' प्रियांका चोप्राचा 'जय गंगाजल' सोनम कपूरचा 'नीरजा' हे चित्रपट पोटापुरता गल्ला जमवत एक्झिट घेतली.पण अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' या मल्टीस्टारर चित्रपटानं 106 कोटींचा आकडा पार केला.

'अलबेला' ची जादू...

काही चित्रपट व त्यातील गाणी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, विस नव्हे तर चक्क साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि त्या चित्रपटाचा 'नायक' हा प्रेक्षकांच्या नेहमी स्मरणात राहतो. तो ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'अलबेला' या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलेली 'शाम ढले खिडकीतले' आणि 'भोली सुरत दिलके खोटे' ही गाणी तुफानच गाजली इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. चित्रपटात मा. भगवान दादा आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. शरीराला वेडेवाकडे झटके न देता जागच्या जागी पावले थिरकवत नाचण्याची स्वतंत्र शैली मा. भगवान दादा यांनी निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली आणि पंजाबी मंडळींचा वर्चस्व असतांना मराठमोळ्या मा. भगवान पालव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर काही काळ अधिराज्य गाजवले.

खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा.भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित 'एक अलबेला' चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रदर्शन साठी सज्ज झाला आहे. यात 'मा. भगवान दादा यांची भूमिका मंगेश देसाई आणि गीता बाली यांची भूमिका बाॅलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या अभिनेत्याच्या जीवनावर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.  

दखल

चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असे मानले तर आपल्या चित्रपटातून आपण काय संदेश देत आहोत आणि समाजमनावर त्याचा काय परिणाम होणार आहे हा विचार दिग्दर्शकाने करणे अपेक्षित आहे. अनेकदा चित्रपट पाहून तरूण वाईट शिकतात, मग रामायण बघून चांगले का शिकत नाहीत, असा प्रश्न केला जातो. चित्रपट, साहित्य या सगळ्यांचाच समाजमनावर कळत नकळत परिणाम होत असतो. परिणाम होत नसेल तर त्या चित्रपटाला अर्थ तरी काय राहिला? म्हणूनच चित्रपटासारखे माध्यम अतिशय काळजीपूर्वक आणि जवाबदारीने हाताळले पाहिजे.शाहीद कपूर चा उडता पंजाब हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुन्हा शाहीद कपूर ने आपल्या अभिनयाने सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले.
              
त्याचे वडील अभिनयातले 'दादा' म्हणून ओळखले जातात. तरी त्याने त्यांची ओळख सुरूवातीच्या काळात कधी सांगितली नव्हती. त्याला नृत्याची आवड होती.नृत्यात निपुण आहे म्हणून 'दिल तो पागल है' नाहीतर 'ताल' सारख्या चित्रपटात नाचणा-यांच्या गर्दीत तो पहिल्यांदा झळकला. मग एका पॉप गाण्यात तो चमकला. त्याला पहिल्यानंतर हा पोरगेलसा दिसणारा बॉलिवूडचा हिरो होऊ शकतो, असे कुणीही म्हणू शकले नसते. पण तो बॉलिवूडचा चॉकलेट हिरो झाला. 'इश्क विश्क' या 2003 साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते आत्ताच्या 'हैदर' पर्यंत पंचवीसपेक्षा जास्त चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. तरीही दरवेळी शाहीद कपरूची नैय्या डुबली असे वाटतेय न वाटतेय तोच... तो कधी 'जब वी मेट' किंवा 'कमीने' नाहीतर 'आर. राजकुमार' सारखा पोस्टर फाडत बाहेर येतो. आपला हिरो परत आल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांना मिळतो. 'हैदर' नंतर पुन्हा एकदा त्याला 'शानदार' अपयशाने धुऊन काढले असले तरी त्याचा 'टॉमी सिंग' अवतार परत 'उडता पंजाब' च्या निमित्ताने तो समोर आला आहे.



'एक खेळ एक संघटना'

बाॅक्सिंगसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आॅलिम्पिकची पदके लुटण्याची भरपूर संधी असते. ही संधी साधण्याची क्षमताही भारतीय खेळाडूंकडे आहे. लंडन येथे झालेल्या आॅलिम्पिकसाठी भारताचे आठ बाॅक्सिंगपटू पात्र ठरले होते. यंदा मात्र केवळ एकच खेळाडू पात्र ठरला आहे. जगात लोकसंख्येबाबत दुस-या क्रमांकाचा देश असलेल्या भारताचा केवळ शिवा थापा हा एकच खेळाडू रिओ
आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. संघटनात्मक पाठबळाच्या अभावी अनेक खेळाडूंना पदकांपासून वंचित रहावे लागले आहे.भारतीय बाॅक्सिंग क्षेत्रासाठी ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे.

भारताच्या तुलनेत खूप छोटे छोटे देशही बाॅक्सिंग क्षेत्रात आॅलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजवीत असतात. या देशांमधील खेळाडूंना फारशा सुविधा व सवलती मिळत नसतात. आर्थिक हमी नसते तरीही हे खेळाडू आपला ठसा उमटवीत असतात. त्यांच्या पाठीशी त्यांची राष्ट्रीय संघटना खंबीरपणे उभी असते. दुर्दैवाने आपल्याकडे गेली अनेक वर्षे संघटना स्तरावर बोंबाबोंबच सुरु आहे. खेळाडूंच्या हितापेक्षाही संघटनेमधील सत्तेच्या हव्यासापोटी अनेक पदाधिकारी आपली खुर्ची टिकविण्यावरच भर देत असतात. मग तिकडे खेळाडूंच्या हालअपेष्टा झाल्या तरी त्याची फिकीर नसते.आत्ताच जागे व्हा आणि 'एक खेळ एक संघटना' हे धोरण राबवा.

रामायण-महाभारताची गोडी...

'रामायण' आणि 'महाभारत' ही महाकाव्ये भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या वाचली जात आहेत.मानवी भावभावनांचे प्रतिबिंब या दोन महाकाव्यातील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीत आजही रामायण व महाभारतातील गोष्टी वाचूनच मुले लहानाची मोठी होतात. काळ आणि पिढी बदलली असली तरी यांची गोडी काही कमी झालेली नाही. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्टूनच्या जमान्यातही लहान मुलांना रामायण-महाभारताने भुरळ घातली आहे.   

रामायण-महाभारतील गोष्टी संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत पोहोचाव्यात आणि यातील पात्रांशी ओळख व्हावी याउद्देशाने काही नामांकित प्रकाशक रामायण-महाभारतील कथा गोष्टी रूपात प्रकाशित करीत आहेत.त्या गोष्टी वाचल्याने मुलांचे एका अर्थाने मुल्यशिक्षण होत आहे.अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरूभक्ती, अभिमन्यूचा साहसीपणा, हनुमानाची स्वामीनिष्ठा,राम आणि
लक्ष्मणाचे बंधुत्व, रामाची पितृभक्ती, सुग्रीवाचे मित्रप्रेम अशा गुणाची ओळख मुलांना होत असते. मराठी बालसाहित्यात गेल्या वर्षभरात कथा, विज्ञानविषयक,शैक्षणिक, चित्रकला,नाटक,धार्मिक अशा विषयांवरील तब्बल 450 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र यात रामायण-महाभारताच्या गोष्टींच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असून यात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे प्रकाशन व्यावसायिकां
कडून कळते.

पक्ष्यांचा वेध आता अॅप वरून

मुंबईसारखे शहरात आणि परिसरात पक्ष्यांच्या तब्बल 250 प्रजाती आढळतात. यामध्ये नेहमी दिसणा-या पक्ष्यांसह काही दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. मात्र मुंबईतील या निसर्गाची आपल्याला नसते. ती माहिती देण्यासाठी काही पक्षी निरिक्षकांनी सात वर्षांच्या अभ्यासानंतर 'वसई बर्डस्' अॅपची निर्मिती केली आहे. सात वर्षांपूर्वी वसईतील कुलदीप चौधरी, अमोल लोपेझ, सचिन मार्टी, लिओनार्ड रिबेलो, प्रज्ञावंत माने, फ्रँकलीन गोन्साल्विस आणि एम.व्ही.भक्त यांनी हौस म्हणून पक्षी निरीक्षणाला सुरूवात केली. छंदातून मिळालेल्या माहितीचे दस्तावेजीकरण सुरू झाले. त्यातूनच या अॅपची कल्पना प्रत्यक्षात आली. मुंबई परिसरातील 250 पक्ष्यांची देणारे हे पहिले अॅप असावे असा पक्षीनिरीक्षकांचा अंदाज आहे.
अॅप कशासाठी
विद्यार्थांना या जैवविविधतेची माहिती व्हावी, त्यायोगे निसर्गाचे संवर्धन व्हावे, स्थानिक पातळीवरील धोक्यांची माहिती व्हावी हा अॅपचा मुख्य उद्देश आहे. पक्ष्यांचे फोटो, त्यांची इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे, अधिवासाचे ठिकाण, खाद्य आणि आवाज यांचा या अॅपमध्ये समावेश आहे. लवकरच पक्ष्यांची मराठी नावेही समाविष्ट करण्यात येतील. पक्ष्यांसोबतच, 50 प्रजातीची फुलपाखरे, काही सस्तन आणि सरपटणारे प्राणी यांच्याही नोंदी केल्या आहेत.
पुस्तकापेक्षा अॅपला प्राधान्य
पक्षी निरिक्षणासाठी जाताना कोणात्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्याचीही माहिती आहे. या दस्तावेजांचे रूपांतर पुस्तकात व्हावे अशा सूचनाही करण्यात  आली. मात्र पुस्तकापेक्षा अलीकडे स्मार्टफोनचा वापर वाढल्याने लोकजागृतीसाठी हे सोयीस्कर माध्यम ठरेल आणि अवघ्या तीन महिन्यात हे अॅप प्रत्यक्षात आले. हे अॅप सर्वांना वापरण्यासाठी
नि:शुल्क उपलब्ध आहे.वसई परिसरातील सुरूची बाग समुद्रकिनारा, डोंगरी, भुईगाव, अर्नाळा, निर्मळ तलाव या ठिकाणी आढळले दुर्मिळ पक्षी. टिकेलचा पर्णवटवट्या, परजीवी समुद्रचोर, नारिंगी छातीची हारोळी, लगाम सुरय, तिरंदाज, सुंदरबनात आढळणारा वाॅटरकॉक नावाचा दुर्मिळ पक्षी वसईजवळ आढळला होता. हे पक्षी दिसून येतात.

क्रिकेटवर चित्रपट नकोसा....

आयपीएल असो वा वनडे सामने क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. मात्र क्रिकेटवर आधारित चित्रपटांची बॉक्स आॅफिसवरची टक्केवारी फारशी बरी नाही. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावर डॉक्युड्रामा असल्याने अर्थातच त्याबाबत उत्सुकता आहे. तसेच 'धोनी... चा टीझर आल्यापासून इंडस्ट्रीत ब-यापैकी सकारात्मक चर्चा आहे. मात्र आजची सिने परिस्थिती बघता चित्रपटात क्रिकेट असो वा नसो चांगला आशय असणे खूप गरजेचे आहे. क्रिकेट हा तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने दिग्दर्शकांच्या दृष्टीने हे सिनेमे बनवणे आणखी अवघड असते.
भारतात मनोरंजनाची दोन मुख्य साधने म्हणजे चित्रपट आणि क्रिकेट मात्र बॉक्स आॅफिसवरची आकडेवारी बघता मोठ्या पडद्यावर जेव्हा जेव्हा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांकडे पाठ फिरवली आहे. हॉकी, बॉक्सिंग, अथलेटिक्स या सगळ्या इतर खेळांवरील हिंदी चित्रपटांनी चांगला गल्ला कमावला असून क्रिकेटच्या पदरी मात्र कायमच निराशाच आल्याचे चित्र आजवर दिसून आलेत. क्रिकेटवर आधारित 'पटियाला हाऊस', 'दिल बोले हडीप्पा','फेरारी की सवारी','चैन कुली की मैन कुली' हे सर्व चित्रपटही गल्ला जमवण्यात अपयशी ठरले आणि बॉक्स आॅफिसवर जादू दाखवण्यात साफ कमी पडले. क्रिकेटवर बेतलेल्या यशस्वी चित्रपटांमध्ये आमिर खानचा 'लगान' हा ऎकमेव असा उल्लेख करता येईल. यामागेसुध्दा क्रिकेट वजा देशप्रेम अशी भावना असल्याने यशस्वी ठरला. तसेच श्रेयस तळपदेच्या 'इक्बाल' या छोट्या बजेटच्या सिनेमाने समीक्षकांसह प्रक्षकांची दाद मिळवली. पण असे झालेले हे पहिले आणि शेवटचे उदाहरण म्हणता येईल.
क्रिकेटपटू स्टार असले तरी आजवर त्यांच्या भूमिका वठवण्यासाठी बॉलिवूडमधले कुठलेच स्टार पुढे आले नाहीत 'अजहर' मध्ये इम्रान हाश्मीने मोहम्मद अझरुद्दीनच्या भूमिकेत दिसला पण हा चित्रपट देखील बॉक्स आॅफिसवर जादू दाखवण्यात अपयशी ठरला. आता सर्व लक्ष यावर्षातच प्रदर्शित होणा-या 'एम एस धोनी...' कडे असणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंग राजपूत असणार आहे.

भटकंती

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

विशाळगड - विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर 'विशाळगड' उभा आहे. विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. गडावर "हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आहे.मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा हा साक्षीदार नक्की बघा...

कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळे मार्गे जाणारी आंबिवले बस घ्यावी. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागेल. तीन किलोमीटरवर पेठ गाव. हा कोठळीगड किल्ल्याचा पायथा. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचावे. खाली तळात काही पंचरशी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.गडावर जाण्याच्या वाटापेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा सामोर्या येतात. प्रथम लागते ती देवीची गुहा व पाण्याचे टाके व नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एक उर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.
किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.

जाहिराती पासून सावधान...

  आजकाल ग्राहकांची विविध मार्गांनी कशी फसवणूक करायची याची जणू स्पर्धाच लागली असल्याचं दिसत आहे. कोणीही यांव आणि ग्राहकांची फसवणूक करून जांव, अशी काहीशी अवस्था ग्राहकाची झाली आहे. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास मेपल या कंपनीचं देता येईल.अनेक जाहिरातींत प्रसिद्ध व्यक्ती मॉडेल म्हणून वापरले जातात. अमाप पैसा मिळतो हे लक्षात घेऊन जाहिराती करणा-या सेलिब्रिटीजना तुम्ही चुकीचं वागत आहात हे कोण सांगणार ?

     एकूणच फसव्या जाहिरातींना न भुलता, बळी न पडता डोळे उघडे ठेवून ग्राहकांनी त्याकडे बघण्याची गरज आहे. ग्राहकांसाठी फक्त रात्रच नाही, तर दिवसही वै-याचा आहे ! विविध माध्यमांतून ग्राहकांवर जाहिरातींचा मारा सतत होत आहे. अनेक भाबडे लोक, विशेषतः लहान मुलं आणि महिला त्या जाहिरातींना भुलत आहेत. आकर्षक जाहिरातींना शरण जाण्याची सवय सोडून जाहिरातींकडे साशंकतेनं व विचारपूर्वक बघायची सवय करावी लागेल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही तशीच सवय लावावी लागेल.

तुमची तक्रार व्हॉट्स अॅप करा ...
खोट्या आणि फसव्या जाहिरातींवर आक्षेप घ्यायला हवा. अशा जाहिरातींच्या विरोधात तक्रार नोंदवणं सोंपं असतं. तक्रार नोंदवल्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही. आक्षेपार्ह जाहिरातींची तक्रार ग्राहक व्हॉट्स अॅपच्या साह्यानं सहजपणे करू शकतो. Advertising standards council of India (ASCI) ने एक व्हॉट्स अॅप नंबर दिलाय 
(91-7710012345). एखाद्या आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणा-या जाहिरातीचा फोटो किंवा लिंक आपण व्हॉट्स अॅपद्वारे पाठवू शकतो. ASCI ही आपल्या तक्रारीची शहानिशा करते आणि निर्णय घेते

स्वाक्षरीबद्दल बोलू काही....

"स्वाक्षरी" म्हणजे सहीबद्दल थोडी माहिती
जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात.
जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात.
काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात.
त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणाचंही नुकसान करु शकतात.
जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात. 
काही लोक सहीच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात. खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आकडता असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो.
जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो.
ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात.
ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मध्येच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याहीब कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते.
काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात. अशा व्यक्ती संतुलित असतात. समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात.
जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहीताना खालून वर घेऊन जातात ते लोक आशावादी असतात. निराशा ही त्यांच्या स्वभावातच नसते. अशा लोकांचा देवावर अधिक विश्वास असतो. या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगलं प्रतिनिधीत्व करू शकतात.....!!!
या माहितीत बऱ्यापैकी तथ्य आढळेल !

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...