समज गैरसमज …


सर्पदंशाच्या उपचारपद्धती आणि सापांविषयी समाजात अनेक शंका व अंधश्रद्धा आहेत. या लेखात आपण त्या विषयी माहिती घेऊ.

साप डूख धरतो, असा अनेकांचा समज आहे. पण सापांची स्मरणशक्ती विकसित झालेली नसते. त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे तो डूख धरत नाही. नागाला नागपंचमीच्या दिवशी दूध पाजण्याचा प्रयत्न अनेक करतात. पण दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. मग तो दूध कसा पिणार? हरणटोळ या जातीचा साप माणसाचा टाळू फोडतो, असा ग्रामीण भागात अनेकांचा समज आहे. पण माणसाच्या कवटीचे हाड कमालीचे कठीण असते. डोक्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉक्टरांना अनेक धारदार, कठीण साधने वापरावी लागतात. हरणटोळ हा साप तर अतिशय नाजूक असतो. मग तो टाळू कसा काय फोडणार? साधारणपणे या जातीचे साप झाडावर असतात आणि झाडावरून ते दंश मारतात तेव्हा माणसाचे डोके या सापाच्या तोंडाजवळ असते. त्यामुळे हा गैरसमज पसरला असावा. सापांना केवडा तसेच रातराणीचा सुगंध आवडतो, असाही समाज असतो पण केवड्याचे बन काटेरी असते. केवड्याचे कणीस खाण्यासाठी उंदीर येत असतात. त्या जागा सापाच्या वास्तव्यास अनुकूल असल्याने केवड्याच्या बनात साप येतात. साप चावल्यास मिरची ‌किंवा कडुनिंबाचा पाला खायला दिल्यास तो गोड लागतो, असाही एक अपसमज आहे. पण सर्पदंशानंतर संवेदना कमी झाल्याने त्या व्यक्तीस काहीही खायला दिले तरी त्याची चव कळत नाही. विषारी साप दंश करताना उलटा झाल्याशिवाय विष टोचू शकत नाही, असे सांगतात. पण विषारी सापचे विषाचे दात तोंडाच्या आतील बाजूस वळलेले असतात. ते एखाद्याच्या शरीरात टोचल्यावर परत काढण्यासाठी त्याचा धडपड करावी लागते. त्यासाठी तो उलटा होतो.

साप चावल्यावर त्या जागी कोंबडीचे गुदद्वार लावून विष उतरते, असे गावातली अनेक मंडळी सांगतात. पण धरून ठेवलेल्या कोंबडीचे गुदद्वार आकुंचन-प्रसरण पावू लागते. ते दंशाच्या ठिकाणी लावल्यावर माणसाच्या जखमेतील रक्तस्त्राव वाढतो. त्यातून विष उतरते असा समज आहे. पण या समजाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तसेच, सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीची मुळी उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर येत नाही आणि सापाचे विष मंत्रानेही उतरवता येत नाही, हे पक्के ध्यानात ठेवावे. कजरीच्या बिया खाल्ल्यास सापाचे विष बाधत नाही आणि सर्पदंशाच्या जागी गरम केलेले (तापून लाल केलेले) लोखंड लावतात का, असेही प्रश्न विचारले जातात पण सर्पदंशावर प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध आहे. त्यामुळे बाकीचे उपाय करून वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. त्वरित दवाखान्यात नेणे हा एकमेव उपाय आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे