मोबाइलला आचारसंहिता लावली तर.??

आई-बाबा ऑफिसमधून थकून भागून आले की मुलांनी त्यांना पाणी देणं, जरा मोठी, कळती मुलं असतील तर त्यांनी आई-बाबांना चहा करून देणं. या किती सामान्य गोष्टी आहेत. पण हल्लीची मुलं आई-बाबांनी घरात पाय ठेवला रे ठेवला  की, आधी त्यांच्या हातातील फोन मिळविण्यासाठी त्यांच्यावर एखाद्या पाळतीवर असलेल्या मांजरासारखी झेप घालतात. फोन घेवून काय करतात तर तासन्तास गेम खेळत बसतात. हातातील फोन जसे स्मार्ट झालेत तशी अगदी दुसरी-तिसरीत जाणारी मुलंही असे स्मार्टफोन स्मार्टली खेळू लागली आहेत.  
आपल्या कामाचा फोन आपल्या मुलांसाठी खेळण्याचं साधन बनला, याबाबत अनेक आई-बाबांची अजिबात तक्रार नाही. मुलाचं फोनवर गेम खेळणं या गोष्टीकडे अगदी सामान्य बाब किंवा मुलांची आवड म्हणून बघणारे आई-बाबा त्यांच्याही नकळत फोनकडे बेबी-सिटर म्हणून  कधी पाहू लागले, ते त्यांनाही कळलं नाही.
फोनवर काय गेमच तर खेळताहेत, म्हणून बिनधास्त राहणार्‍या आई-बाबांना खडबडून जागे करणारे मुलांचे मोबाइलवरचे प्रताप हल्ली उजेडात येऊ लागले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे नेट कनेक्टिव्हिटी असलेल्या या फोनवर नकोत्या वयातील मुलांनी ‘नको ते’ बघणं आणि त्याहून भयंकर म्हणजे आईबाबांच्या फोनवरून ते नको त्या लोकांना फॉरवर्ड करणं. 
तासन्तास फोनला चिकटलेली,  स्मार्टफोन हाती आल्यावर वयापेक्षा अतिस्मार्ट होऊन आपल्या हातातील साधनाचा गैरवापर करणारी  मुलं आज अनेक घरात आहेत. त्यांच्या हातातील फोन तात्पुरता काढून घेण्यानं ही समस्या मुळापासून सुटेल का? हाच खरा प्रश्न आहे. आजार झाल्यावर त्यावर उपचार ही तर ठरलेली रीत. पण आजारच होऊ नये म्हणून आधीच प्रतिबंधात्मक इलाज केले तर? 
त्यासाठीची ही काही औषधं..
मोबाइलला आचारसंहिता लावली तर.??
-  अनेक घरात टीव्हीच्या बाबतीत आचारसंहिता असते. सतत टीव्ही बघून अभ्यासाकडे, खेळाकडे किंवा इतर अँक्टिव्हीटीकडे मुलाचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. मुलांनी किती वेळ टीव्ही पहावा, टीव्हीवर काय पहावं, काय पाहू नये म्हणून अनेक घरात मुलांना नियम घालून दिले जातात. 
- आपल्या अपरोक्ष मुलांनी काही विशिष्ट चॅनल्स पाहू नये म्हणून अनेक आईबाबा टीव्हीचे चाइल्ड लॉक अँक्टिव्ह करून ठेवतात. अशीच खबरदारी स्मार्टफोनच्या बाबतीतही घेतली तर?  
- मुलांच्या हातात स्मार्टफोन द्यायचाच नाही. असा पर्याय निवडण्याआधी स्मार्टफोनवर त्यांनी कोणते अँप्स हाताळावे आणि कोणत्या अँप्सना अजिबात हात लावू नये हे नीट कारणासहित समजून सांगितलं तर?  
कौतुकाआधी थोडा विचार केला तर?
- अनेक आई बाबांना आपली मुलं स्मार्टफोनवरून कसा स्मार्टली संवाद साधतात याचं मोठं कौतुक असतं. 
- फेसबुक, व्हॉट्सअँपवरून मेसेजेस पाठवणार्‍या आपल्या मुलांविषयी बोलताना अनेकांचा ऊर भरून येतो.  
- पण इतक्या लहान वयात मित्रांशी आणि नातेवाइकांशी शक्य असतानाही थेट संपर्क साधण्याऐवजी संवादासाठी म्हणून आपण मुलांना  या व्हच्र्युअल जगात का नेतो याचा विचार  आधीपासून करायला काय हरकत आहे?
मुलं बोअर झालीच नाहीत, तर.? 
- बर्‍याचदा मुलं बोअर होतंय म्हणून आई-बाबांचा फोन हातात घेतात. आपली मुलं जर या कारणानं फोन हातात घेत असतील तर  त्यांच्या हाताला आणि डोक्याला मिळणारा खाऊ कमी पडतोय असं समजावं. 
- घरात असताना, घरातली कामं करताना मुलांशी गप्पा  मारून किंवा आपण करत असलेल्या कामात त्यांना सहभागी करून  गुंतवून ठेवलं तर मुलं बोअर होणार नाहीत.  
- वस्तू किंवा खेळ देवून नाही तर वेळ देवून मुलांचे प्रश्न सोडविता येतात का हे पाहता येइल.
हिसकावून घेण्यापेक्षा गिफ्टच दिला तर.??
1. स्मार्टफोन म्हटला की महागडी वस्तू आणि लहान मुलांशी त्याचा काही संबंध नाही असंच बहुदा आई-बाबांना वाटतं.   
2. फोनवर झडप घालण्याची जशी वृत्ती मुलांमध्ये असते तशीच मुलांच्या हातून फोन हिसकावून घेण्याची सवय आईबाबांना असते. आणि नेमक्या याच गोष्टीमुळे मुलं स्मार्ट फोनचा आपल्या अपेक्षेच्या उलट वापर करायला शिकतात.
3. मुलांकडून फोन हिसकावून घेण्यापेक्षा तो त्यांना समजा गिफ्टच दिला तर..?  मुलांच्या वाढदिवसाला/  नविन वर्षाचं गिफ्ट म्हणून मुलांना स्मार्टफोन तर द्यायचा पण  तो देतांना  हा फोन आहे खेळणं नाही हे मुलांना नीट समजावून सांगायचं असा पर्याय काढता येऊ शकेल.
4. आई-बाबा घरी नसतांना किंवा सोबत नसतांना घरात-बाहेर सुरक्षित वाटावं यासाठीचं हे माध्यम आहे, आपल्याला शिकवणारं, मदत करणारं हे एक साधन आहे याची   मुलांना जाणीव करून देणं वाटतं तेवढं अवघड नाही.
काही साधे उपाय :
वापरून पाहीले, तर?
 1 मुलांना स्मार्टफोन देतानाच तो वापरण्याची नियमावली सांगा.  त्यांनी कितीवेळ मोबाईल वापरावा? कसा वापरावा? फोनवर  काय करावं व काय करु नये हे पहिल्यापासूनच मुलांना सांगितलं तर उत्तम. 
2.  फोनवरून ते कुणाकुणाला कॉल करु शकतात , कितीवेळ फोनवर बोलू शकतात, फोन, मेॅसेजेसचं महिनाभरातलं प्रमाण किती असावं याबाबतचे नियम स्पष्ट शब्दात मुलांना सांगता यायला हवेत.  
3.  स्मार्टफोनवर मुलांच्या उपयोगी असलेले अँप्सच डाऊनलोड करा. 
4  फोन किती वापरायचा, कधी वापरायचा, कुठे वापरायचा आणि कुठे  नाही याची नियमावली आधीच मुलांना सांगून ठेवा. आणि ती तोडली तर शिक्षा असं सूत्रंही नियमाला बांधून घ्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

अभिनंदन केले पाहिजे

बॅड पॅच

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....