मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

प्रणव धनावडेचं सहस्रदर्शन!
एक क्षण, एक दिवस. माणसाचं आयुष्य बदलू शकतं. प्रणव धनावडे हा कालपर्यंत कुणीही नव्हता. असलाच तर तो एक रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या मेहनती माणसाचा क्रिकेट खेळणारा मुलगा होता.
एका अधिकृत शालेय स्पर्धेत त्याने एका डावात १००९ धावा केल्या. तो अचानक सर्व प्रसारमाध्यमांच्या मथळ्याचा विषय बनला. उद्यापासून त्याचं आयुष्य बदलू शकतं. या विश्वविक्रमी मुलाचे वडील रिक्षा चालवतात असं आता म्हटलं जाईल.
प्रथम त्याच्या विश्वविक्रमाचं कौतुक करू या. कालपर्यंत एका खेळीत एक हजार धावांचं पहाटेला स्वप्न पडणं, हासुद्धा वेडेपणा ठरवला गेला असता. त्याने त्या प्रत्यक्षात केल्या. मीही ती बातमी ऐकल्यावर प्रथम स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. आणि मी जागा असल्याची खात्री करून घेतली. मग कुणीतरी मला म्हणालं, 'मैदानाच्या स्क्वेअर सीमारेषा लहान होत्या.' असतील! माझं म्हणणं आहे की, गल्लीतच काय, घराच्या व्हरांड्यात, 'बाजूच्या भिंतीला चेंडू लागला की दोन धावा आणि समोरच्या भिंतीला लागला की चार धावा' अशा नियमात खेळूनही हजार धावा करणं सोपं नाही. आईने गोलंदाजी टाकली तरी कठीण आहे. आज कलियुगाऐवजी द्वापारयुग असतं, तर कुणीतरी स्वर्गस्थ देवाने, भीष्माच्या 'इच्छामरणाच्या' वराच्या धर्तीवर प्रणवला 'इच्छाबाद' होण्याचा वर दिला होता किंवा प्रतिस्पर्धी संघाला विध्वंसाचा शाप दिला होता वगैरे म्हटलं गेलं असतं. तशी कथानकं लिहिली गेली असती.
मी ती खेळी पाहिलेली नाही. पण त्या खेळीचं डोळ्यांसमोर चित्र उभं करताना गंमत वाटली. ३२७ चेंडूत त्याने १००९ धावा कुटल्या. (कुटल्या या क्रियापदाला सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल.) म्हणजे निर्धाव चेंडू हा अॅवॉर्डचा विषय ठरला असेल. क्षेत्ररक्षकांनी फक्त कुरिअर कंपनीचं काम केलं असावं. गोलंदाजांच्या भावना या रोड रोलरखाली पिचल्या जाणाऱ्या डांबरापेक्षा वेगळ्या नसाव्यात. के. सी. गांधी शाळेच्या एका विद्यार्थ्याने बॅटने केलेली हिंसा पाहून स्वर्गात महात्मा गांधीसुद्धा सुखावले असतील. ही अशी एकमेव हिंसा, जिचं कौतुक होतं.
तो टी-२०च्या युगातला आहे म्हणून तो अशी खेळी इतक्या कमी चेंडूत खेळला. त्याच्याकडे फटके असावते. महत्त्वाचं म्हणजे त्याने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना म्हणे चक्क १००० धावांचं स्वप्न पाहिलं. माय गॉड! असं स्वप्न पुरं करताना गल्लीतसुद्धा दबाव येऊ शकतो. पण तो टी-२० च्या युगातला एक शाप ठरू शकतो. म्हणून त्याला उःशापाची गरज आहे. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी या शतकाकडे एक गोड स्वप्न म्हणून पाहावं आणि विसरून जावं. त्यांचं आयुष्य आता बदलेल. कौतुकाचे चेक्स येतील. प्रसारमाध्यमं तो खेळायला लागल्यावर घोंगावायला लागतील. त्याने लक्षात ठेवावं. या गोष्टी क्षणभंगुर असतात. टी-२० आयपीएलचा हव्यास अजिबात धरू नको. शाळेत मोठी शतकं ठोकणारे अनेक झाले. पण पुढे त्या सगळ्या टेकड्या ठरल्या. पण दोनच फलंदाज खरीखुरी हिमशिखरं ठरली. एक सुनील गावसकर, दुसरा सचिन तेंडुलकर. एक कांचनजंगा, दुसरं एव्हरेस्ट!
इच्छा एवढीच आहे की इथून पुढे त्याने पाय घट्ट जमिनीवर ठेवून चालावं. फलंदाजी नावाच्या देवतेला फक्त धावांचाच अर्घ्य दिला की ती प्रसन्न होते. ती प्रसन्न झाली की लक्ष्मीची वेगळी पूजा करावी लागणार नाही.
कल्याण म्हटलं की, शिवाजी महाराजांच्या काळातली सुभेदाराच्या सुनेची दंतकथा आठवते. आता प्रणव धनावडे दंतकथा बनू शकतो. त्याचं हे 'सहस्रदर्शन' एक छोटंसं बीज आहे. त्याचा वृक्ष होतो का, हे त्याची मेहनत, त्याची गुणवत्ता, त्याची निष्ठा ठरवेल.
तूर्तास, एका मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे

तूच तुझी वैरी

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....