२५५ वर्षांपूर्वीची संक्रांत

                 🚩२५५ वर्षांपूर्वीची संक्रांत🚩

         "पानिपत" ! मराठ्यांना पडलेले एक दुःखद स्वप्न !
         १७६१ साली आजच्याच दिवशी म्हणजेच 'मकरसंक्रांतिला' सव्वा लाख मराठे धारातीर्थी पडले.
संपूर्ण देशावर चालून आलेले, "अहमदशहा अब्दाली" नावाचे संकट ! व त्याला प्रतिकार करण्यासाठी हजारो मैल "पानिपतावर" सामोरे गेले ते फक्त "मराठे" !!!
पण तोपर्यंत 'पेशव्यांनी' गनिमी कावा सोडला होता, कुटुंब-कबिल्याला फौजेबरोबर न्यायचे नाही हा "शिवरायांनी घालून दिलेला संकेतही मोडीत काढला होता ! १लाख अठरापगड जातीच्या मराठा सैन्याला, लढण्याबरोबरच काळजी घ्यायची होती ती लाखाहून जास्त 'पेशव्यांच्या' नातेवाईकांची, यात्रेसाठी सैन्याच्या बरोबर आलेल्यांची, बाजारबूनग्यांची !!
१४ जानेवारी १७६१ ! मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मध्यान्हीचा सूर्य तळपत होता, उपाशीपोटी आणि अपुऱ्या वस्त्रांनिशी "मराठे" रणांगणावर थैमान घालत होते. शिंदे, होळकर, गायकवाड, माने, पायगुडे, शिळमकर आदी सरदारांच्या मावळ्यांचा "शिवाजी महाराजकि जय" असा जयघोष चालू होता. अब्दालीने पळ काढला व तो टेकाडावर सुरक्षित ठिकाणी गेला. नकळत त्याच्या तोंडातून निघाले "साले ये मरहट्टे किस मिट्टीसे बने है ?" हटतच नाहीत !!
सूर्य मावळतीकडे चालला, उपाशीपोटी मराठ्यांना भोवळ येत होती तरी ते शत्रूला 'पाणी' पाजत होते. अब्दालीने ताज्या दमाची कुमक उतरवली ! आणि पारडे फिरले ! युद्धाचा नूरच पालटला.
उपाशी व थकलेल्या मराठ्यांना, ताज्या दमाच्या शत्रूसैन्याने कापून काढायला सुरुवात केली, जगातील एक भयानक रणसंहार सुरु झाला ! महाराष्ट्रातील एकही गाव नसेल, जेथील "मावळा" या युद्धात मेला नाही ! सव्वा लाख सवाष्णींचे चुडे फुटले !! "मराठ्यांचे पानिपत" झाले !!!
या युद्धाचे पडसाद आजही उमटताना दिसतात. उत्तरेत आजही मराठा वीरांच्या शौर्यकथा सांगितल्या जातात ! परकीय चक्रापासून देशाला वाचविण्यासाठी, संपूर्ण एक "पिढी" अर्पण करणाऱ्या या महाराष्ट्राला देशाने सलाम केला !
आज "मकरसंक्रांत" साजरी करताना, गोड-धोड व तिळगूळ यांचा आस्वाद घेताना, कोठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्या अज्ञात "पानिपतवीरांना" श्रद्धांजली वाहूयात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल