'एक खेळ एक संघटना'
बाॅक्सिंगसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आॅलिम्पिकची पदके लुटण्याची भरपूर संधी असते. ही संधी साधण्याची क्षमताही भारतीय खेळाडूंकडे आहे. लंडन येथे झालेल्या आॅलिम्पिकसाठी भारताचे आठ बाॅक्सिंगपटू पात्र ठरले होते. यंदा मात्र केवळ एकच खेळाडू पात्र ठरला आहे. जगात लोकसंख्येबाबत दुस-या क्रमांकाचा देश असलेल्या भारताचा केवळ शिवा थापा हा एकच खेळाडू रिओ
आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. संघटनात्मक पाठबळाच्या अभावी अनेक खेळाडूंना पदकांपासून वंचित रहावे लागले आहे.भारतीय बाॅक्सिंग क्षेत्रासाठी ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे.
भारताच्या तुलनेत खूप छोटे छोटे देशही बाॅक्सिंग क्षेत्रात आॅलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजवीत असतात. या देशांमधील खेळाडूंना फारशा सुविधा व सवलती मिळत नसतात. आर्थिक हमी नसते तरीही हे खेळाडू आपला ठसा उमटवीत असतात. त्यांच्या पाठीशी त्यांची राष्ट्रीय संघटना खंबीरपणे उभी असते. दुर्दैवाने आपल्याकडे गेली अनेक वर्षे संघटना स्तरावर बोंबाबोंबच सुरु आहे. खेळाडूंच्या हितापेक्षाही संघटनेमधील सत्तेच्या हव्यासापोटी अनेक पदाधिकारी आपली खुर्ची टिकविण्यावरच भर देत असतात. मग तिकडे खेळाडूंच्या हालअपेष्टा झाल्या तरी त्याची फिकीर नसते.आत्ताच जागे व्हा आणि 'एक खेळ एक संघटना' हे धोरण राबवा.
टिप्पण्या