न संपणारा टिवटिवाट....

करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने करून पुन्हा टिवटिव करण्यास सुरवात केली असून त्याला पाकिस्तानच्या काही  क्रिकेटपटूंनी पाठिंबाही दिला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं द्वंद्व प्रत्येकाने अनुभवलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र प्रत्येक भारत-पाक सामन्याआधी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. जो संघ सामना जिंकतो त्यानंतर पुढचे काही दिवस सोशल मीडियावर चाहतावर्ग धुमाकूळ घालतो.

भारताने पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करावेत, तसेच करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशा मागण्या जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केल्या होत्या. त्यामुळे त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. भारत-पाक यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्याचा विचार मांडला होता. यातून मिळणारं उत्पन्न हे करोनाविरुद्ध लढ्यात दोन्ही देश वापरतील असाही पर्याय शोएब अख्तरने सुचवला होता. मात्र भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी शोएबच्या या कल्पनेला पूर्णपणे विरोध केला आहे.सध्या खेळ हा देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. सध्या गरजू व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे, तुम्ही भावनिक होऊन म्हणू शकता की भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळली जायला हवी. पण सध्या सामने भरवणे ही प्राथमिकता मुळीच नाहीये. जर तुम्हाला पैसेच हवे असतील, तर तुम्ही सीमेपलीकडून भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा असे रोखठोक मत कपिल देव यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानचे खेळाडू हे देशासाठी खेळायचे, पण भारताचे खेळाडू मात्र स्वत:साठी खेळायचे. "आम्ही जेव्हा भारता विरूद्ध क्रिकेट खेळायचो, तेव्हा त्यांची म्हणजे भारताची फलंदाजी ही आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होती. पण पाकिस्तानचे फलंदाज फलंदाजी करताना ज्या ३०-४० धावा करायचे, त्या धावा संघासाठी करायचे. याउलट भारताचे खेळाडू मात्र स्वत:च्या विक्रमांसाठी शतक ठोकायच्या मागे लागायचे. ते देशासाठी नव्हे, तर स्वत:साठी खेळायचे", असा इंझमामने दावा केला.भारताजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबद्दल  नेहमी शांत बसणारा इंझमाम काहीच बोलला नाही.शतक ठोकणे ही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते 50 ओव्हर मैदानावर उभे राहावे लागते.

 "मला भारतीय संघाबद्दल नेहमी वाईट वाटायचं. आमच्याविरोधात खेळताना ते नेहमी दबावाखाली असायचे. मी ज्यावेळी नाणेफेकीसाठी जायचो, त्यावेळी भारतीय कर्णधाराच्या चेहऱ्यावर नेहमी टेन्शन असायचं. भारतीय कर्णधार नेहमी घाबरलेला असायचा. त्या काळात भारत हा आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी नव्हताच, वेस्ट इंडिज हा तेव्हाचा सर्वोत्तम संघ होता आणि त्यांच्यासारखे खेळाडू मी बघितले नाहीत." स्थानिक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील  लॉड् र्सच्या मैदानावर वेस्ट इंडिज या सर्वोत्तम संघाला नमवून भारताने सर्वप्रथम विश्वविजेते पद प्राप्त केले हे विसरून चालणार नाही तसेच भारतीय संघ जर घाबरला असता तर एकदा नव्हे दोनदा विश्वचषक प्राप्त केला असता का? ही विचार करणारी गोष्ट आहे.आजही भारताकडे दर्जेदार,अष्टपैलू आणि स्फोटक फलंदाज आणि गोलंदाज आहेत की त्यांच्याकडे एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने तोपर्यंत होणे शक्य नाहीत, जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे, असे मत आधी आफ्रिदीने व्यक्त केले होते. त्यात आता त्याने आणखी गरळ ओकली आहे. "आम्ही (पाकिस्तान) भारताशी क्रिकेट खेळायला तयार आहोत, पण मोदी सरकार असेपर्यंत तरी हे शक्य नाही. कारण मोदी सरकार म्हणजे नकारात्मकता! मोदी सरकारच्या कार्यपद्धतीतून नकारात्मक भावना दिसून येते. पाकिस्तान भारताशी क्रिकेट खेळण्याबाबत कायम सकारात्मक आहे, पण भारतानेही थोडी सकारात्मकता दाखवायला हवी", असे आफ्रिदीने म्हटले आहे. कोरोनाविरूध्द मदतनिधीसाठी डावखूरा फलंदाज युवराज आणि फिरकीचा गोलंदाज हरभजन यांनी सोशल मीडियावर आफ्रिदीच्या कामाचे कौतुक केले त्याच आफ्रिदीने आपल्या "गेम चेंजर" या आपल्या आत्मचरित्रात भारतीय फलंदाज गौतम गंभीरचा माजोरडा म्हणून उल्लेख केला. दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वतः काय ते पहावे.क्रिकेट सकारात्मक मग दहशतवाद काय? हे असे  नेहमीच चालत राहणार हे न संपणारे टिवटिवाट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल