तहान लागल्यावर

"तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे.
पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय.केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते.पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं.
    आज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अमलात का आणू शकत नाही ?
आपण स्वतःला 'शेती प्रधान 'देश म्हणवतो. आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष का आहे ?अहो पाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट ' होईल ही परिस्थिती येतेच कशी ?जपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का ? ते अमलात कोण आणणार ? इथे 'पाणी वाचवा' हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का ? आज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याचा माज आलाय असं मला आता वाटतं.
     गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात, कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा, किंवा कुठल्यातरी हिडीस गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, 'पाणी वर्षभर कसं वाचवता येईल' ह्यावर देखावा करा किंवा व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा. सण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो कि बकरी-ईद कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये. शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती वाचवायलाच हवी.आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय. उद्या देव न करो पण पृथ्वीवर कुठे
पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल.
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...