भटकंती

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

विशाळगड - विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर 'विशाळगड' उभा आहे. विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. गडावर "हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आहे.मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा हा साक्षीदार नक्की बघा...

कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळे मार्गे जाणारी आंबिवले बस घ्यावी. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागेल. तीन किलोमीटरवर पेठ गाव. हा कोठळीगड किल्ल्याचा पायथा. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचावे. खाली तळात काही पंचरशी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.गडावर जाण्याच्या वाटापेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा सामोर्या येतात. प्रथम लागते ती देवीची गुहा व पाण्याचे टाके व नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एक उर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.
किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...