व्हाय वी शूड हायर यू ?

व्हाय वी शूड हायर यू ? आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ? असा प्रश्न बर्‍याचदा काही मुलाखतकर्ते विचारतात. व्यक्तिश: मला या प्रश्नाचं फारसं समाधानकारक उत्तर आतापर्यंत तरी मिळालेलं नाही. मुळात हा प्रश्न विचारण्याची तशी आवश्यकताच नाही . कारण जर तुम्ही उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावलं असेल, तर हा निर्णय तुमचा आहे. उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याइतपत काही गुण आहेत,
 म्हणून तुम्ही त्याला बोलावलेलं आहे. हे उघड आहे ना, पण तरीही काही महाभाग हा प्रश्न उमेदवारांना विचारतात.
आणि त्यामुळे त्याचं उत्तर देणंही गरजेचं आहे. हा प्रश्न सोडून तर देता येणार नाही. मग तो नीट हॅण्डल कसा करायचा याविषयी आज जरा बोलू.
काही उमेदवार या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देतात. ‘‘तुम्ही मला बोलावलं, मग तुम्हीच सांगा.’’ असं बोलून टाकतात. आता सांगा, कोणत्या मुलाखत घेणार्‍याला हे उत्तर आवडेल ? नाहीच आवडत.
तसंही मुलाखत म्हणजे उमेदवाराला स्वत:चं मार्केटिंग करण्याची गरज असते. अर्धा-एक तासाच्या कालावधीत तो स्वत:ला मार्केट करत असतो. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ही मार्केटिंग मिटिंग असते, अशा वेळेस ह्या प्रश्नाने घाबरण्याचं किंवा गोंधळण्याचं फारसं कारण नाही.
फक्त या प्रश्नाच्या उत्तराची आधी तयारी करणं गरजेचं आहे.
त्यासाठी तुम्ही ज्या पदाच्या मुलाखतीसाठी जाता त्या पदाची तुम्हाला माहिती हवी. त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता, क्षमता काय हे माहिती हवं, त्या माहितीचा वापर उत्तरात करता येईल.
 समजा, तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मुलाखत देणार असाल, तर या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता काय, अनुभव काय, कौशल्य कोणती, ती तुमच्यात कशी आहेत, त्याचा  तुम्हाला नवीन जॉबमध्ये कसा उपयोग होईल, हे प्रभावीपणे सांगता येऊ शकेल.
एका पदासाठी बरेचशे उमेदवार असतात. या सर्व उमेदवारात तुम्ही वेगळे कसे आहात, हेही सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी काही गोष्टी विचारात घ्या. अनुभव, शिक्षण कदाचित सर्व उमेदवारांकडे असू शकेल, पण  एखादं उत्तम कौशल्य आपल्याचकडे आहे, हे तुम्ही सांगू शकता. उदा. अगदी तणावाखाली काम करण्याचा गुण. ज्यामुळे तुम्ही अधिक प्रभावी ठरू शकता, हा गुण दुसर्‍या उमेदवाराकडे कदाचित नसू शकेल. हे
 उत्तर एखाद्या उदाहरणासहित तुम्ही देऊ शकाल. त्याचा फायदा होऊ शकेल.
तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी थोडा विचार करा, त्यामध्ये कंपनीला कसा उमेदवार हवा आहे, कंपनीचं वातावरण कसं आहे, आवश्यक गुणधर्म कोणते लागणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये आपण कोठे फिट होतो, याचा विचार केल्यास या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं होईल.
आत्मविश्‍वासानं उत्तर द्या,  उद्धटपणानं नाही !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल