झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता

नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार दक्षिण अमेरिका खंडामध्ये सध्या फार वेगाने होत आहे. या विषाणूला वेळीच आवर नाही घातला, तर वर्षअखेरीपर्यंत तब्बल चाळीस लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठकही बोलाविली आहे. 

जन्मजात होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः मातेच्या गर्भातच होतो. या रोगाला मायक्रोसेफॅली म्हणतात. इतर व्यक्तींनाही हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्‍याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. 2014 ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्‍चचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडूनच हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्राझीलमध्येच या विषाणूचा प्रसार अधिक असल्याने जन्माला येणाऱ्या पिढीतील बहुतांश जणांना हा रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

काय आहे झिका विषाणू? ताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या "एडिस इजिप्ती‘ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्‍यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे. प्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्‍यता असते. 


लक्षणे या रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात. 


विषाणूचा प्रसार - 1947 मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती. 
- 1960 मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला. 
- काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले. 
- 1966 मध्ये दक्षिण आशियामध्येही याचा रुग्ण आढळला. 
- 1970 च्या दशकात पाकिस्तान, भारत, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये हा विषाणू सापडल्याची नोंद 
- 2007 मध्ये मायक्रोनेशिया बेटावरील दोनशे जणांना प्रादुर्भाव 
- 2013 मध्ये फ्रान्सच्या आधिपत्याखालील पॉलिनेशिया येथे तब्बल 35 हजार रुग्ण आढळले. 
- 2014 मध्ये ब्राझीलमध्ये रुग्ण आढळला. 
- 2015 मध्ये कोलंबियामध्येही विषाणूची नोंद 
- 2015 च्या डिसेंबरमध्ये मेक्‍सिकोलाही रुग्ण आढळल्याने सर्व अमेरिकेमध्ये धोक्‍याचा इशारा 
- युरोपमधील काही देशांमध्येही विषाणूची नोंद 

तीव्रता आणि परिणाम - गर्भवती महिलांना गर्भपात करण्याची परवानगी देण्याची ब्राझीलमध्ये मागणी 
- ब्राझीलमध्ये यंदा ऑलिंपिक स्पर्धा होणार असल्याने त्यानंतर विषाणूचा प्रसार जगभर होण्याची भीती 
- दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह 23 देशांमध्ये विषाणू पसरला आहे 
- आतापर्यंत 50 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद 
- एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 
- अमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

आताच एवढा धोका का? आतापर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळले असले तरी त्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच, अनेकदा काही विशिष्ट भागापुरताच त्याचा प्रसार झालेला आढळला होता. गेल्या आठवड्यात मात्र या रोगाची जवळपास चार हजार प्रकरणे पुढे आल्याने आणि तीव्रताही अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. गर्भाच्या कोणत्या अवस्थेत असताना हा रोग होतो, याबाबतही निश्‍चित माहिती नसल्याने उपचार करणेही कठीण जात आहे. 

उपाय या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या जागेमध्ये जाणे टाळावे. दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये सध्या प्रवास करणे टाळण्याचा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 

झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता नवी दिल्ली - काही देशांमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला आरोग्य मंत्रालय आणि एम्समधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक गटाने तातडीने उपाययोजना करावी आणि आवश्‍यक ती पावले उचलावीत, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि झिका विषाणूचा धोका टाळण्यासाठी भारत आवश्‍यक ती सर्व पावले उचलेल, असे नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितले. 

वर्षअखेरपर्यंत लस शक्‍य 
अनेक देशांसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या झिका विषाणूचा सामना करण्यासाठी उपयुक्त लस या वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. अमेरिका आणि कॅनडाचे संशोधक ही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. "झिका‘चा सामना करण्यासाठी कदाचित ही पहिली लस असेल, असे एका वरिष्ठ संशोधकाने सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...